‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी भजन व भक्तीमय वातावरणाने भाविक मंत्रमुग्ध
उद्या महाभिषेक, महाप्रसाद आणि समारोप : मंत्री गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली भेट
जळगाव । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आयोजित ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याचे दुसरे पुष्प आज, २५ डिसेंबर रोजी गुंफले गेले. ‘इंडियन आयडॉल’ फेम नितीन कुमार यांनी सादर केलेल्या भजन कार्यक्रमाने उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला मंत्री ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही भेट दिली.
दरवर्षी प्रमाणे यंदाही पाळधी येथील प्राचीन श्री सच्चिदानंद सद्गुरू साईबाबा, परमभक्त हनुमान आणि स्वयंभू गायत्री माताजी मंदिराचा २२वा वर्धापनदिन भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक उत्सवाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून वातावरण भक्तीरसाने ओतप्रोत झाले आहे. उद्या, २६ डिसेंबर रोजी अभिषेक आणि महाप्रसादाच्या आयोजनासह या सोहळ्याची सांगता होणार आहे.
ब्रह्मोत्सवात भाविकांना मंदिराच्या गौरवशाली परंपरेचा अनुभव घेता येत असून, या निमित्ताने एकात्मतेचा संदेश दिला जात आहे.