लाच भोवली ! सरपंचासह तिघे एसीबीच्या जाळ्यात
जळगाव । चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे येथील सरपंचासह तिघांना लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सरपंच राजेंद्र महादू मोरे (57), ग्रामपंचायत शिपाई शांताराम तुकाराम बोरसे (50), आणि खाजगी इसम सुरेश सोनू ठेंगे (40) यांचा समावेश आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
70 वर्षीय तक्रारदाराने धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली होती. बहाळ ग्रामपंचायतीने तक्रारदाराच्या शेतजमिनीवर हक्क दाखवत भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता निर्माण केली होती. यावर तक्रारदाराने न्यायालयात मनाई हुकूम आणला होता. त्यानंतर सरपंच मोरे यांनी तक्रारदाराकडे कोर्ट कचेर्यांचा त्रास होऊ नये यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 5 लाखांवर आली होती.
तक्रारदाराच्या तक्रारीनंतर 29 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाने तपास सुरू केला. ठरल्याप्रमाणे 26 डिसेंबर रोजी पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात 2 लाख रुपये खाजगी इसम सुरेश ठेंगे यांनी सरपंच मोरे यांच्या घरात स्वीकारले. यानंतर धुळे एसीबीच्या पथकाने सापळा रचून ठेंगे, मोरे, आणि शिपाई बोरसे यांना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार राजन कदम, सुधीर मोरे, रामदास बारेला, आणि प्रवीण पाटील यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.
या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात कारवाईच्या बाबतीत एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.