धक्कादायक ! 33 वर्षीय महिलेने नऊ वर्षीय मुलीसह उचललं टोकाचं पाऊल
जळगाव । एरंडोलमधील जहांगीरपुरा भागात घरातच गळफास घेऊन 33 वर्षीय सपना माळी आणि तिची नऊ वर्षांची मुलगी केतकी यांनी आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीवरून, सपना माळी या घटस्फोटीत होत्या आणि त्या आपल्या मुलीसह माहेरी राहत होत्या. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली असून, एकल पालक असलेल्या सपनाबाबत शोक व्यक्त केला जात आहे.
सपना माळी यांचा भाऊ, राहुल माळी, घरी परतल्यावर त्यांना बहिणीचा आणि भाचीचा काहीही पत्ता लागला नाही. त्यांनी तिसऱ्या मजल्यावर असलेल्या खोलीचा दरवाजा वाजवला, मात्र आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर, त्यांनी चुलत भाऊ मोहन महाजन याला फोन करून माहिती दिली. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न निष्फळ झाल्यामुळे सुताराला बोलावून दरवाजा तोडण्यात आला.
दरवाजा उघडताच, सपना आणि केतकी या दोघी मायलेकी छताच्या वेगवेगळ्या कड्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून राहुल माळी यांनी आक्रोश केला.
घटनास्थळी मिळालेल्या वहीत सपना माळी यांनी आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचे लिहून ठेवले होते. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.