जळगावात जोरदार पाऊस, नागरिकांची उडाली धांदल
जळगाव । जिल्ह्यात आज अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. हवामान खात्याने याबाबत आधीच सतर्कता व्यक्त केली होती, आणि त्यानुसार दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या भागांमध्ये 27 आणि 28 डिसेंबर रोजी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. आज सकाळपासूनच वातावरणात गारवा जाणवत होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली, आणि त्यानंतर 2.55 वाजता पाऊस जोरात बरसू लागला. जळगाव शहरासह परिसरात मुसळधार पावसाचा अनुभव आला.
या पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रब्बी पिके, ज्यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा यासारख्या पिकांचा समावेश होतो, त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, शहरातील नागरिकांची पावसामुळे चांगलीच धावपळ उडाली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत आणखी पावसाचा धोका संभवतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.